Reg No. F-51/Satara/30/4/1963 Mumbai/69/N.S.T.R

blog

संपादकीय (मा. श्री. डी . के . जाधव )
०7-जानेवारी -२०१४

महाबळेश्वर हे पश्चिम महाराष्ट्रातील भूप्रदेश दऱ्याखोऱ्या, डोंगर व निसर्गसौंदर्याचा अप्रतिम नमुना आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता डोंगराळ प्रदेश व सह्याद्रीच्या पर्वत रांगा व सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर हे सर्वांचे आवडते असे प्रेक्षणीय स्थळ आहे.

या दऱ्याखोऱ्यातील सामान्य माणसांची प्रगती व विकास होण्याच्या मार्गात नेहमीच दोन मोठ्या अडचणी येत असतात त्यातील पहिली म्हणजे प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व दुसरी शैक्षणिक मागासलेपण. हे शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचे महत्वाचे काम सन १९६४ साली स्थापन झालेली कोयना एजुकेशन सोसायटी करत आहे. कोयना एजुकेशन सोसायटीची स्थापना प्रतापगडाच्या पायथ्याशी कुंभरोशी या गावात झाली. या स्थापनेत मा. श्री. भि. दा . भिलारे, श्री. सोंडकर, श्री. हरिभाऊ जाधव, व त्यानंतर श्री. फळणे गुरुजी, श्री. एम. आर. भिलारे, श्री. धो. ह. जाधव (बापू) यांचे मोलाचे योगदान आहे.

सन १९६७ साली तळदेव तालुका महाबळेश्वर येथे संस्थेची पहिली शाळा सुरु झाली. त्यानंतर २० वर्ष्याच्या कालावधीत जावली व महाबळेश्वर तालुक्यात संस्थेच्या तळदेव, सावली, सायगाव, दापवडी, कुंभरोशी, आपटी, गोगवे, वाघावळे, अशी आठ माध्यमिक शाळा व तापोळा भाग शाळा व सायगाव, तळदेव कनिष्ठ महाविद्यालये व पाच वसतिगृहे असा विस्तार झाला.

तळदेव येथे संस्थेचे कार्यालय व मुख्य शाळा व वसतिगृहे असून शाळेत गावाचा आधार वाटावा आणि गावास शाळेचा अभिमान वाटावा या न्यायाने संस्थेचे कामकाज ताळेश्वर च्या आशीर्वादाने या ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्याने सुरु आहे. समाज संरचनेतील एक पायाभूत सामाजिक संस्था म्हणून शिक्षण संस्थेचा विचार केला जातो. समाज विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये शिक्षण प्रक्रियेचे महत्व व अस्तित्व दिसून येते. मानवाच्या प्रत्येक पिढीत ज्ञानाची वृद्धी ही शिक्षण प्रक्रियेच्या साहायाने व हस्तांतरणाद्वारे होत आली आहे. ज्ञानाची ही परंपरागत शृंखला म्हणजेच शिक्षण होय. शिक्षणाचा मूळ उद्देशच ज्ञानरूपी प्रकाशाला प्रकाश प्राप्त करून अज्ञानरूपी अंधाराला दूर करणे हा आहे. या देशाला माणूस घडविणारे शिक्षण हवे हा स्वामी विवेकानंदांचा ध्यास होता.

बहुजन समाजातील तळागाळातील, डोंगराळ व दुर्गम भागातील मुलांपर्यंत सर्व सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. या दृष्टीने कोयूना एज्युकेशन सोसायटी काम काम करीत असून माणूस घडविणारे शिक्षण देण्याची फार मोठी जबाबदारी संस्थेचे शिक्षक करीत आहेत. स्वतःच्या वैयक्तिक अडचणी व कौटुंबिक अडचणी बाजूला ठेऊन आपल्या ध्येयाच्या दिशेने सदैव धडपड करीत असून शिक्षणाच्या पवित्र कार्यात योगदान करीत आहेत. ही संस्थेची परंपरा असून त्याचे पालन संस्थेत कार्यरत असलेल्या सर्व घटकातून केले जाते म्हणूनच येथील गुणवत्तेचा आलेख उंचावत राहिला आहे.

 

भौतिक सुविधा

 

संस्थेच्या गोगवे, दापवडी येथे स्वतःच्या मालकीच्या इमारती नव्हत्या गोगवे येथे सहा खोल्यांची प्रशस्त इमारत बांधून झाली व दापवडी येथील जागेचा प्रश्न सुटला असून येथेही लवकरच इमारत बांधण्याचा संस्थेचा मनोदय आहे. सावली येथे आठ खोल्यांच्या इमारतीचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. आपटी येथेही एक आठ खोल्यांची इमारत प्रास्ताविक असून लवकरच काम सुरु होईल. वाघावळे येथेही दोन खोल्यांचे काम सुरु आहे. तळदेव येथील शाळा, वसतीगृह डायनिंग हॉल तसेच तापोळा येथील एक माजली वसतिगृहाची इमारत ही कामे पूर्ण झाली आहेत. संस्थेला या सर्व भौतिक सुविधा पुरवण्याच्या कामी ज्या व्यक्तींनी मदत केली त्या सर्वांचे आभार. या सर्व कामांमध्ये मा. मुख्यामंत्री सहाय्यता निधी, सिद्धिविनायक ट्रस्ट, मा. श्री रजनीकांत मेहेता व सौ. इलाबेन मेहेता यांनी केलेली मदत व संस्थेचे पत्करलेले पालकत्व याला कशाचीही याला कशाचीही तोड नाही. मा. मधुकरभाई पारीख, मिस्त्री कुटुंबीय मा. उमेशजी नाईक, निता विल्लर व कुटुंबीय बाबुभाई कनाकिया एस. पी. ए. ट्रस्ट, रोटरी क्लब साऊथ मुंबई, मिलनबेन मेहेता, डॉ. सुदेवी हजारे, श्रीमती. स्वप्ना मेहेता, रमणलाल शहा शांतीबेन व करसनदास ठक्कर शिल्पा शहा, वंदना व सुरेश हरियानी, अमेय व आनंद शहा, अजमेय शहा, मुख्य न्यायाधीश श्री. सुभाष प्रसाद, शरद मेहेता, शुभाषभाई संघवी, विनोदभाई बुद्धदेव, किशोरभाई मेहेता, मंजू पटेल, निलेश रमणलाल शहा, मितुल पटेल, तन्मय शहा, विलास कांबळे तसेच ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संस्थेला मदत केली त्या सर्वांच्या योगदानाबद्दल संस्था आभारी आहे.

 

संस्थेने सुरु केलेले उपक्रम

 

संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी हा प्रगतीचा आणि सर्वांच्या प्रयात्नांचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी जे जे काही आम्हाला करणे शक्य आहे. त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. काळाच्या गतीबरोबर आपणही गतिमान असणे अपरिहार्य आहे. संस्थेतील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन अनेक आवाहनांना पेलत पेलत मी स्वतःची स्वतंत्र अशी पायवाट चोखाळतो आहे. पुढे जात असताना मी नेहमी मागेही पाहतो आपण कुठे वर आलोय याचा नेमका अंदाज घेतल्याशिवाय पुढील प्रवासातील दूरदृष्टीचा पल्ला गाठण्यासाठी पक्के नियोजन करता येत नाही नेमक्या नियोजनाशिवाय तसे यश हाती येत नाही.

प्रत्येक शाखेतील सर्व शिक्षक सकाळ व संद्याकाळ जादा तासांचे योगदान देऊन सक्षम व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करतात. त्यामुळे सर्व शाखांचे निकाल ९५ ते १०० टक्के लागतात.

ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या कुटुंबात राहतो तेथे त्याचा वाढदिवस साजरा होणे दुरापास्त असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे वाढदिवस नियमितपणे साजरे केले जातात.

प्रत्येक वर्षी संस्था व तज्ञ मार्गदर्शक व संस्थेतील आजी व माजी मुख्याद्यापक यांचे मार्फत शाळांची वार्षिक तपासणी करून प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन केले जाते.

संस्थेतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून उपक्रमशील शाळा, शाळा स्तरावरील स्नेहसंमेलनानंतर संस्थांतर्गत, स्नेहसंम्मेलन भरविण्यात येऊन, स्नेहसंमेलनात प्राविण्य दाखविणाऱ्या शाळांचा गौरव केला जातो.

संस्थेच्या ५० वर्षाच्या कार्यकालात अनेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले. महाराष्ट्राचे माजी मुख्यामंत्री कै. वसंतराव नाईक, देशाचे कृषिमंत्री महोदय मा. ना. श्री. शरदराव पवार, माजी शिक्षण संचालक मा. श्री. वि. वि. चिपळूणकर, थोर साहित्यिक कै. श्री. पु. ल. देशपांडे तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या संस्थेला भेटी दिल्या आहेत

संस्था एकूण पाच वसतिगृहे चालवीत असून वसतिगृहे नसतील तर या परिसरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकणार नाही. ही सत्यस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या आर्थिक मदतीने वसतिगृहे चालवली जातात. सुरुवातीच्या काळात अत्यंत कमी विद्या वेतनावर चालणाऱ्या वसतिगृहांच्या विद्यावेतनात वाढ करण्यासाठी मा. श्री. बाळासाहेब भिलारे (दादा) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना शासनाकडून वेतनेत्तर अनुदान दिले जात होते. परंतु सन २००४ - २००५ या आर्थिक वर्षापासून शासनाने वेतनेत्तर अनुदान, इमारत भाडे देणे पूर्णतः बंद केल्याने ग्रामीण भागातील व प्रामुख्याने जेथे गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा शाळांच्या व्यवस्थापनावर शाळा चालवण्याचा आर्थिक भार सहन न झाल्यामुळे विपरीत परिणाम झाला आहे.

एकीकडे विना अनुदानित शाळांमधून वारेमाप पैसे भरून सर्व भौतिक सुविधा शैक्षणिक साधन सामुग्रीचा वापर करून श्रीमंतांच्या मुलांना मिळणारे शिक्षण तर दुसरीकडे भौतिक सुविधांचा शैक्षणिक साधन सामुग्रीचा अभाव त्यामुळे शिक्षण प्रक्रियेवर होणार विपरीत परिणाम त्यातून दिले जाणारे शिक्षण यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड दरी निर्माण होऊ लागली आहे. आपल्या सारख्या संस्थांना विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क आकारता येत नाही. तरीही संस्थेने आपल्या शाळांच्या भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने योग्य त्या प्रमाणात पुरविणेचा प्रयन्त केला आहे.

याशिवाय शासनाने शिक्षकेतर सेवकांची रिक्त पदे भरण्यास सन २००० सालापासून प्रतिबंध लादले आहेत शाळेत उपलब्ध असलेली लेखनिक व सेवकांची पदे रिक्त राहिल्याने शाळेच्या कार्यालयीन कामकाजावर तसेच स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत आहेत. या कामांचा विपरीत परिणाम अध्यापन - अध्ययन प्रक्रियेवर होत असून त्याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. आपला शैक्षणिक विकास व्हायला हवा आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यांना अनुभव संपन्न ज्ञान मिळाले पाहिजे. त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या अपेक्षांची पूर्तता असेल तर ग्रामीण भागातील खाजगी शाळांच्या मागे शासनाने आर्थिक पाठबळ उभे केले

शिक्षणाचा हक्क विधेयक २० जुलै २००९ रोजी राज्य सभेत संमत झाले आणि २७ ऑगस्ट २००९ पासून भारताच्या सर्व राज्यात (जम्मू आणि काश्मीर सोडून) लागू झाले. ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला त्याच्या निवासाच्या जवळ असलेल्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार एकही मूल शाळाबाहय राहणार नाही तसेच कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षण अभियान योजनेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांवर निधी खर्च करणार आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदी फारच चांगल्या आहेत व त्या न राबवल्यास शिक्षेची तरतूद केलेली आहे.

कोयना एज्युकेशन सोसायटीच्या महाबळेश्वर तालुक्यातील शाळांमध्ये या विभागातील प्राथमिक शाळांचा या कायद्यातील अनुषंगाने विचार केला तर येथील परिस्थिती भयावह आहे प्रत्यक खेड्यात प्राथमिक शाळा आहे व त्या शाळेवर पुरेसा शिक्षक वर्गही आहे मात्र शाळेमध्ये विद्यार्थी संख्या अपुरी आहे व प्रत्येक वर्षी यात घट होत आहे. या परिसरातील पालकही शहराकडे जात असल्याने या सर्वांचा विपरीत परिणाम या परिसरातील माध्यमिक शाळांवर होत आहे.

ज्यांची अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी असते. त्यांच्या मनात, तेज, तप, व तितिक्षा निर्माण होते. परिश्रमांचे विविध प्रकल्प राबवताना येथील मातीचा सुगंध जाणविल्याशिवाय राहत नाही.

ह्या शेताने लळा लाविला असा की,
सुखदुख्खाला परस्परांशी हसलो - रडलो
आता तर हा जीवाच अवघा असा जखडला
मी त्यांच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो